पुणे - मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे सेवा १६ ऑगस्टपर्यंत खंडित करण्यात आली आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर जोरदार पावसामुळे पाणी साचल्याने तसेच वारंवार दरडी कोसळत असल्यामुळे रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित नाही. यामुळे हा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
या मार्गावर सातत्याने दरडी हटवण्याचे काम करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी साचले आहे तो मार्ग साफ करण्याचा रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. सातत्याने येणार्या अडथळ्यांमुळे पुणे-मुंबई दरम्यानची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर मुसfळधार पावसाने पाणी साचले आहे. तसेच काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे हा मार्ग असुरक्षित असल्याने पुणे आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वे १६ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
पुणे मुंबई धावणारी इंटरसिटी एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस या गाड्या १६ ऑगस्टपर्यंत रद्द झाल्या आहेत. दक्षिण मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मिरज, लोंढा मार्गे जाणाऱ्या अनेक गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या अर्ध्या मार्गापर्यंत धावणार असून काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पाणी रेल्वेमार्गावर आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चाकरमानी, नागरिक, प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.