पुणे - लोणावळ्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या 3 दिवसांपासून शहरासह परिसरात वरूण राजाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणेकर पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. त्यात आज रविवारची सुट्टी असल्याने सकाळ पासूनच अनेक पर्यटकांनी लोणावळ्याच्या धबधब्यावर हजेरी लावली.
या ठिकाणी असाच पाऊस राहिला तर येथील भुशी धरण काही तासातच भरण्याची शक्यता आहे. लोणावळा शहर हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी पुणे, मुंबईसह, परराज्यातून पर्यटक येत असतात. पावसामुळे लोणवळ्यात अनेक धब-धबे ओसंडून वाहात आहेत. दरम्यान, शनिवारी या ठिकाणी ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जून पासून आतापर्यंत ५७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांनी आज धब-धब्यावर येवून आनंद लुटला. तसेच यावेळी पर्यटक मक्याचे कणीस आणि लोणावळा चिक्कीचा आस्वाद घेण्यास विसरले नाहीत.