एनडीएच्या 140 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ संपन्न, आज संचलन
एनडीएच्या 140 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. आज संचलनाचा सोहळा पुण्यातील एनडीएच्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे. दरम्यान, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून 215 जणांना पदवी प्रदान करण्यात आली. यात 18 मित्र देशातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
केरळमध्ये मान्सूनपूर्वी परिस्थिती बनायला सुरूवात, दोन दिवसात मान्सून दाखल होणार
मान्सून गुरुवारी बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्वेकडील भागात पोहोचला असल्याचे समोर आले होते. सद्यस्थितीत मान्सून मालदीव आणि कोमोरिन भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनची हिच गती कायम राहिल्यास केरळात आज, उद्या किंवा सोमवारपर्यंत दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुण्यातील विकेंड लॉकडाऊन रद्द; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मागील काही दिवसांपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शिवाय शनिवार आणि रविवार असा विकेंड कडक लॉकडाऊन देखील लागू करण्यात आला होता. मात्र, आता हा विकेंड लॉकडाऊन रद्द करण्यात आल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. राजेश टोपे यांनी पुण्यातील विधान भवन येथे कोरोना आढावा बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
सौरव गांगुली मुंबईत, आज महत्त्वाची बैठक
बीसीसीआयची एक विशेष बैठक (एसजीएम) होणार आहे. या बैठकीसाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली काल मुंबईत दाखल झाला आहे. दरम्यान, आयपीएल 2021 मधील उर्वरित सामने, यंदाची टी-20 वर्ल्डकप आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा या सर्व गोष्टींवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील लॉकडाऊनचे नवे नियम जाहीर होणार
महाराष्ट्रात लॉकडाऊनचे निर्बंध सरसकट उठवले जाणार नाहीत. पण काही ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जाईल. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन हटवणे शक्य नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज किंवा उद्या नवी नियमावली जारी होईल, असे त्यांनी सांगितले आहे.
LSAT प्रवेश परीक्षा आज
लॉ स्कूल एडमिशन कौन्सिलतर्फे (LSAT) घेतली जाणारी लॉ स्कूल प्रवेश परिक्षा आजपासून होणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. लॉ स्कूल एडमिशन टेस्ट 2021 मध्ये एकूण 92 मल्टिपल चॉईस प्रश्न असतील. यासाठी 2 तास 20 मिनिटांचा कालावधी असेल. या परीक्षेच्या नोंदणीची अंतिम तारीख 14 मे होती.
निकिता ढौंडियाल आजपासून लेफ्टनंट पदावर होणार रुजू
पुलवामा हल्ल्यातील शहीद जवान मेजर विभूती ढौंडियाल यांची पत्नी निकिती ढौंडियाल आज भारतीय लष्करात लेफ्टनंट पदी रुजू होणार आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांनी short Service Commission (SSC) हा अर्ज भरला होता. त्या परिक्षेत निकिता उत्तीर्णही झाल्या. त्यानंतर त्यांनी चेन्नईत Officer Training Academy प्रशिक्षण घेतले.
जळगाव शहरात आज पाणीपुरवठा राहणार बंद
जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुर पंपिंग स्टेशनवर अमृत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 500 अश्वशक्तीचे नवीन पंप मोटारसह बसवण्यात येत आहेत. तसेच, सब स्टेशनवरील विद्युत देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे शहराला आज होणारा पाणीपुरवठा 30 मे रोजी तर, 30 मे रोजी होणारा पाणीपुरवठा 30 मे रोजी होणार आहे.
अभिनेत्री अनुप्रियाचा आज वाढदिवस
अभिनेत्री अनुप्रिया गोयंकाचा आज वाढदिवस आहे. आश्रम वेब सिरीजमध्ये तिने उत्तम भूमिका साकारली आहे.
अभिनेते विजय पाटकरांचा आज वाढदिवस
मराठमोळे अभिनेते विजय पाटकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटकात भूमिका साकारल्या आहेत.