पुणे - नव्याने लागू करण्यात आलेले कृषी कायदे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील मंडई परिसरात सर्व पुरोगामी पक्ष व संघटनांच्यावतीने मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या मानवी साखळीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांचे संरक्षण काढून घेण्याचा प्रयत्न -
या मानवी साखळीमध्ये जन आंदोलन संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान संघर्ष समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समितीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. दिल्लीच्या दरवाज्यावर जमलेल्या आंदोलक शेतकऱ्यांची अतिशय साधी मागणी आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांची हमीभावाने धान्य खरेदी करणे आणि बाजार समित्यांचे संरक्षण हेच शेतकऱ्यांचा आधार होते. परंतु शेतकऱ्यांचा हाच आधार सरकार आता काढून घेत आहे. शेतीव्यवस्था अदानी-अंबानी सारख्या कार्पोरेट आणि बड्या व्यापाऱ्यांच्या हाती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. त्यामुळे न्याय मागण्यासाठी लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर जमले आहेत, अशी प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित अभ्यंकर यांनी दिली.
एकजूट दर्शवण्यासाठी मानवी साखळीचे आयोजन -
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याचे सोडून या सरकारने त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. कडाक्याच्या थंडीत त्यांच्यावर गार पाण्याचे फवारे मारले. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी शेतकरी पाठिंब्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज संपूर्ण देशात कामगार, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांची एकजूट दर्शवण्यासाठी आज पुण्यात मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे, शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे, साठेबाजीविरुद्धच्या कायद्यात बदल व्हावेत, परंतु अवाजवी बदल करू नये आणि अदानी-अंबानी सारख्या कार्पोरेट कंपनीच्या हातात शेती जाता कामा नये, या मागण्यांसाठी आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आज या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.