पुणे - पिपंरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या देहूरोड आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत तीन जणांना गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. देहुरोड पोलिसांनी सराईत रावण टोळीतील सदस्य सागर मलकारसिद्ध परीट (वय- २३) तर सांगवी पोलिसांनी दसिम शफिकोद्दीन मनियार (वय-२५,रा.जुनी सांगवी) आणि अनिकेत उर्फ सोन्या अशोक बाराथे (वय २१,रा दापोडी) यांना अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळंके, पोलीस कर्मचारी भिसे, गुत्तीकोंडा हे गस्त घालत होते. त्यावेळी कर्मचारी भिसे यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, मणियार आणि बाराथे हे दोघे जण गावठी कट्टा घेऊन ममता नगर येथे येणार आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून सापळा रचून दोघांना अटक करण्यात आले. त्यांच्याकडे दोन गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.
दुसऱ्या घटनेत देहूरोड पोलिसांना रावण टोळीतील सदस्य सराईत गुन्हेगार सागर परीट हा निगडी अप्पूघर येथे गावठी कट्यासह फिरत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सचिन शेजाळ यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित ठिकाणी जाऊन आरोपीला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली आहेत. तो रावण टोळीचा सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.