पुणे - लोणावळा शहर पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून काही मोबाईल जप्त करण्यात आले असून ते पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हातातील मोबाईल हिसकावून पोबारा करत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पंकज दत्ता शर्मा (वय 38 वर्षे, रा. कैवल्यधाम, लोणावळा) हे पायी जात असताना दुचाकी वाहनावरून आलेल्या दोघांनी शर्मा यांच्या शेजारी गाडी थांबवत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या हातातील मोबाईल घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती तसेच शर्मा यांनी तक्रार दिली होती.
या घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी परिसरात वेशांतर करत खासगी वाहनांमधून गस्त घालत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, तीन अल्पवयीन मुले यांनी चोरी केली आहे. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली आहे. पैकी, एका अल्पवयीन मुलावर या अगोदर लोणावळा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा - केंद्राची मदत यायच्या आधी ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा - खासदार संभाजीराजे