पिंपरी-चिंचवड (पुणे) - भारत विरुद्ध इंग्लड क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या आणि घेणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तीन वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यात एकूण 33 जणांना अटक करण्यात आली असून 45 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यातील काही बुकींना घोरडेश्वर डोंगरावरून बेड्या ठोकण्यात आल्या असून ते दुर्बिणीच्या साहायाने क्रिकेट सामन्यावर नजर ठेवून होते. त्यांना सहा सेकंदपूर्वी समजत असल्याने सट्टा लावणे सोपे पडत होते.
45 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
आरोपींकडून 74 मोबाईल, 3 लॅपटॉप, 8 कॅमेरे, दुर्बीण, विदेशी नोटा, असा एकूण 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मध्यप्रदेश येथील 5, हरियाणा येथील 13, महाराष्ट्रातील 11, राजस्थान येथील 2 आणि गोवा, पोर्तुगाल, उत्तर प्रदेश येथील प्रत्येकी एका अटक करण्यात आली आहे.
घोरडेश्वर डोंगरावरून लावायचे सट्टा?
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असणाऱ्या गहूंजे क्रिकेट मैदानात भारत विरुद्ध इंग्लड क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या आणि घेणाऱ्या 33 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 45 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील आठ जण हे घोरडेश्वर डोंगरावर जाऊन प्रत्यक्ष क्रिकेट सामन्याच्या प्रत्येक चेंडूवर नजर ठेवून सट्टा लावत असल्याचे समोर आले आहे. त्यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा - पुणे आगीमध्ये अनेकांसाठी देवदूत ठरलेल्या अधिकाऱ्यावर काळाचा घाला!