पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात चोरीचे प्रमाण वाढले असून आता देव घरही सुरक्षित नसल्याचे एका चोरीच्या घटनेतून समोर आले आहे. शहरातील पिंपरी येथील शीतला देवी मंदिरात अज्ञात दोन चोरांनी दानपेटी आणि देवीचा चांदीचा मुकुट लपास केला आहे. याप्रकरणी रोहन नंदकुमार हराळे यांनी पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील शीतलादेवी मंदिरात अज्ञात दोन चोरट्यांनी टेहळणी करून मंदिरातील दानपेटी आणि चांदीचा मुकुट पळविला. दुचाकीवरून दोन जण मंदिर परिसरात आले होते. या पैकी एकाने अगोदर मंदिर परिसरात पाहणी केली आणि त्यानंतर मुख्य मंदिराच्या दरवाज्याची कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरांनी दानपेटी आणि १५ हजार रुपयांचा चांदीचा मुकुट लंपास केला. चोरी केल्यानंतर दोघे जण दुचाकीवरून फरार झाले. मात्र, ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या आधारे पिंपरी पोलीस अज्ञात चोरांचा शोध घेत आहेत. सदर घेटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक निकम करीत आहेत.