बारामती (पुणे) - महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. मात्र, लॉकडाऊन होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घेणे ही तेवढेच महत्वाचे आहे. कोरोनाचे संकट संपले नाही, कोरोना अद्याप गेलेला नाही, शासनाने दिलेल्या नियमांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर शहरासह तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज (दि.२७) रोजी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट तसेच सर्व विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार नाही
लॉकडाऊनच्या नावाखाली विनाकारण काहीजण साठेबाजी करण्याची शक्यता आहे. इंदापूर भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष, डाळिंब या फळांचे पिक घेतले जाते. लॉकडाऊनच्या भीतीने शेतकरी सध्या आपल्या मालाचा भाव जितका आहे, त्यापेक्षा कमी भावाने विक्री करतात. राज्यात लॉकडाऊन होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, असेही भरणे यांनी सांगितले.
नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन
इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात भिगवण, पळसदेव तसेच शहरातील आंबेडकरनगर परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून हा परिसर हॉटस्पाॅट बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गाफिल न राहता शासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन भरणे यांनी इंदापूरकरांना केले. ते पुढे म्हणाले, सध्या शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. मात्र अभ्यासिका, वाचनालये यांना मुभा देण्यात आली आहे. नागरिकांनी आठवडे बाजार, मंडई याठिकाणी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. नागरिकांवर शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असून जे नागरिक आदेशांचे, नियमांचे पालन करणार नाहीत अशा नागरिकांवर कारवाई करण्याच्या सूचना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित विभागाला दिल्या.