पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १४ तोळे सोन्याचे दागिने मिळून एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई वाकड पोलिसांनी केली. अनिल कुकरेजा (वय-४३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्यावर जळगाव येथे विविध गुन्हे दाखल आहेत.
डिसेंबर महिन्यात नितीन नंदलाल गोगीया यांच्या घरी रात्री उशिरा चोरीची घटना घडली होती. सराईत आरोपी कुकरेजा याने घराचे कुलूप तोडून ४ लाख ७० हजार रुपयांचे मुद्देमाल लंपास केला होता. यात १४ तोळे सोन्याचे दागिने देखील आहेत. यानंतर गोगीया यांनी वाकड पोलिसात तक्रार केली होती.
हेही वाचा - रांजणगाव एमआयडीसीत प्लास्टिकच्या गोडाऊनला आग
तांत्रिक माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने वाकड परिसरात घरफोडी केल्याचं कबूल केले आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस घरफोडीचे गुन्हे वाढत आहेत. यामुळे पोलिसांनी देखील कंबर कसल्याचा दिसून आले आहे.