पुणे : ईडी गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करत आहे. याविरोधात देशभरातील 9 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे. या पत्रानंतरही ही कारवाई न थांबता सुरू असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याचवेळी ईडीच्या या कारवाईविरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) गट आक्रमक झाला असून लवकरच राज्यभर जेलभरो करणार आहे. शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे येथील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शहराध्यक्ष गजानन थरकुडे, संजय मोरे उपस्थित होते.
ईडीच्या प्रमुखपदी त्यांची वर्णी : यावेळी सुषमा अंधारे यांनी आज भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टिका केली आहे. त्या म्हणाल्या की सोमय्या यांनी आजपर्यंत शिवसेनेच्या जेवढ्या जेवढ्या नेत्यांवर आरोप केले, ते भाजपमध्ये किंवा शिंदे गटात गेले. त्यांचे पुढे काय झाले. कोणत्याही कारवाईच्या आधी यांना कसे काय कळत?. किरीट सोमय्या आरटीआय कार्यकर्ते आहे की काय अस प्रश्न पडत आहे. काल स्वच्छतादुत असलेल सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. ती परिषद म्हणजे बंबाट्या मारणे सारखी होती. मला तर असे वाटते की, सोमय्या यांची ईडीच्या प्रमुखपदी त्यांची वर्णी लागली आहे काय? अशी टीका यावेळी अंधारे यांनी सोमय्या यांच्यावर केली आहे.
पंतप्रधानांनी त्या पत्राला उत्तर द्यावे : काही दिवसांपूर्वी देशभरातील 9 प्रमुख पक्षाध्यक्षांनी ईडीच्या बेकायदेशीर कारवाईच्या विरोधात पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. आज घटनात्मक प्रमुख म्हणून पंतप्रधानांनी त्या पत्राला उत्तर द्यावे. मात्र, ते होत नसून उलट कारवाई होत आहे. किमान सचिवांनी तरी उत्तर द्यावे. देशाचा पंतप्रधान हा भाजपचा नाही. त्याच्याकडून उत्तर नाही पण भाजपचे प्रवक्ते उत्तर देत आहेत. असेही अंधारे यावेळी म्हणाले.
सोमय्या ईडीचे कर्मचारी आहेत का? : आज भाजप नेते सोमय्या ज्या पद्धतीने वागत आहे ते पाहता ते राजकारणी कमी माहिती अधिकारी जास्त वाटत आहे. त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप केला होता. सरनाईक यांनी शरणागती पत्कारली आणि त्यांनी तिकडे प्रवेश केला. त्यांचे काय आत्ता तसेच आनंद अडसूळ, भावना गवळी, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक यांच्या बद्दल त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतल्या होत्या. अनेक वेळा त्या त्या ठिकाणी जाऊन देखील आले. मग आत्ता काय झाले आहे. ज्या खेड प्रकरणात सदानंद कदम यांच्यावर कारवाई झाली या प्रकरणात पण सोमय्या यांनी ११ वेळा या ठिकाणी भेटी दिल्या आहेत. सोमय्या ईडीचे कर्मचारी आहेत का? असा सवाल देखील यावेळी अंधारे यांनी केला आहे.