पुणे - कोरोना विषाणूची प्रतिबंधात्मक लस कोविशिल्डच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला आजपासून सुरुवात होणार आहे. ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्युटने निर्माण केलेल्या या लसीची देशभरातील 1600 जणांवर चाचणी करण्यात येणार आहे. त्यातील ससूनमध्ये जवळपास दीडशे ते दोनशे जणांवर कोविशिल्ड लसीची चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता मुरलीधर तांबे यांनी दिली.
लसीच्या चाचणीचा हा भारतातील तिसरा व अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ससूनमध्ये दीडशे ते दोनशे जणांवर चाचणी केली जाणार आहे. ज्या स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात येणार आहे, त्यांच्यावर सहा महिने लक्ष ठेवले जाणार आहे. या स्वयंसेवकांची संपूर्ण चाचणी केल्यावरच त्यांना या लसीच्या चाचणीत सहभागी केले जाणार आहे. कोविशिल्ड ही लस दिल्यानंतर पुढील सहा महिने त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यांना काही त्रास होत आहे का, त्यांच्या आरोग्यात काही बदल होत आहे का, अश्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर लक्ष दिलं जाणार असल्याचेही तांबे म्हणाले.
कोविशिल्ड या लसीच दोन डोस स्वयंसेवकांना दिल जाणार आहे. एक डोस दिल्यानंतर दुसर डोस 28 दिवसानंतर दिल जाणार आहे. अगोदर या स्वयंसेवकांची चाचणी केली जाते यात अन्टीबॉडीस तपासणी, आरटी पीसीआर तपासणी केली जाते. ही चाचणी पंधरा ते वीस दिवसात पूर्ण करून त्यां स्वयंसेवकांवर पुढील सहा महिने त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातो, अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता मुरलीधर तांबे यांनी दिली आहे. भारतात 17 ठिकाणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या लसीच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. इंग्लंडमधील एका स्वयंसेवकाची तब्येत बिघडल्यांनंतर लसीची चाचणी जगभरात थांबविण्यात आली होती. पण त्या लसीचा आणि त्या सवयंसेवकाच्या तब्येत बिघडल्याचा संबंध नसल्याच्या लक्षात आल्यानंतर पुन्हा या लसीच्या चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे.
तिसऱ्या चाचणीला आजपासून सुरुवात झाल्यानंतर ज्या स्वयंसेवकांवर या लसीचा चाचणी केली जाणार आहे. त्यांच्यावर पुढील सहा महिने लक्ष ठेवले जाणार आहे. कोविशिल्ड लसीची तिसरी चाचणी यशस्वी झाल्यानंतर साधारणता मे ते जून मध्ये ही लस सर्वत्र दिली जाईल, अस म्हटलं जात आहे.