पुणे - स्वारगेट चौकातील भुयारी मार्गात अनेक खड्डे झाल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच खड्डे बुजविण्यात आले होते. त्या ठिकाणी परत खड्डे झाल्याचे चित्र या भुयारी मार्गावर पाहायला मिळत आहे.
स्वारगेट चौक हा वर्दळीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणची वाहतूक कोंडी रोखण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला होता. या मार्गावर आता खड्डे पडले असून हा मार्ग धोकादायक बनला आहे. त्यात पावसाचे पाणी साठत असल्याने वाहनधारकांना याचा नाहक त्रास होत आहे. हे खड्डे लवकरात लवकर बुजवावे, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. त्याचबरोबर भुयारी मार्गात लाईटचीही सोय नाही. त्यामुळे भुयारात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
या भुयारामधील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी केली जाते. नंतर त्या रस्त्यांकडे प्रशासन लक्ष देत नाही. जेव्हा एखादी घटना घडते तेव्हाच प्रशासन जागे होत त्याठिकाणी उपाययोजना करत असते. त्यामुळे हा भुयारी रस्ता दुरुस्त करण्यासाठी प्रशासन एखादा अपघात होण्याची पाट पाहत आहे का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
हेही वाचा - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; पाहा...