पुणे - जिल्ह्यातील राजगुरूनगर येथील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू असताना अचानक एक अश्लील व्हिडिओ सुरू झाला. यामुळे अतिशय विचित्र स्थिती निर्माण झाली होती. या प्रकारानंतर या खासगी शाळेने खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून या प्रकाराचा तपास व्हावा, अशी मागणी केली आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने ही तक्रार दाखल केली आहे.
खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल -
खेड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले की 'ऑनलाइन वर्गाच्या लिंक पासवर्डसह विद्यार्थ्यांना शेअर केल्या जातात. आम्हाला शंका आहे की कोणीतरी बाहेरील व्यक्तीने ही लिंक पाठवली आहे. या व्यक्तीने लॉग इन आणि पासवर्डची माहिती मिळवली होती. त्यानंतर या बाहेरच्या माणसाने ही पॉर्न क्लिप शेअर करण्याचा खोडसाळपणा केला आहे.' पाचवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू असताना अचानक जशी हा पॉर्न व्हिडिओ क्लासमध्ये पॉप अप झाली तसे विद्यार्थ्यांनी पटापट सेशनमधून लॉग आउट करणे सुरू केले होते. काही विद्यार्थ्यांच्या पालकांच्या लक्षात आले की विद्यार्थ्यांचा वर्ग सुरू असतानाच मध्येच हा पॉर्न व्हिडिओ सुरू झाला आहे. त्यांनी या प्रकाराची तक्रार करण्यासाठी तातडीने अधिकाऱ्यांनी संपर्क साधला.
विद्यार्थ्यांनी अॅपमध्ये लॉगिन केल्यानंतर झाला हा प्रकार -
पोलीस निरीक्षक गुरव यांनी सांगितले की 'शाळेच्या मुख्याध्यापकांनी या प्रकाराची तक्रार केली आहे. या घटनेचा पुढील तपास करण्यासाठी आम्ही पुणे ग्रामीण पोलिसांच्या सायबर तपास टीमकडे हे प्रकरण पाठवणार आहोत. जवळपास ३० विद्यार्थी आपल्या लॅपटॉप किंवा स्मार्टफोनद्वारे या ऑनलाइन क्लासमध्ये सहभागी झाले होते. तेव्हा अचानक हा पॉर्न व्हिडिओ सुरू झाला. विद्यार्थ्यांनी अॅपद्वारे लॉगिन केल्यानंतर लगेचच ही घटना घडली आहे.
पालक आणि विद्यार्थी झाले हैराण -
पोलीस अहवालात म्हटले आहे की अनेक पालक सर्वसाधारणपणे आपल्या पाल्यांना ऑनलाइन क्लासच्या वेळेस मदत करतात. विशेषत: लॉगिनसारख्या तांत्रिक बाबींच्या बाबतीत पालक विद्यार्थ्यांबरोबर हजर असतात. अॅपद्वारे लॉगिन केल्यानंतर स्क्रीन उघडल्याबरोबर सर्व पालक हैराण आणि थक्क झाले. शिक्षणाऐवजी पॉर्न व्हिडिओ दिसू लागल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. ऑनलाइन क्लास सुरू असताना विचित्र किंवा असभ्य घटना घडण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. कोरोनाच्या संकटकाळात लोकांनी हे ऑनलाइन शिक्षणाचे मॉडेल स्वीकारल्यानंतर असे अनेक आक्षेपार्ह प्रकार समोर येत आहेत. शिक्षकांनी ऑनलाइन क्लासमध्ये काही गैरप्रकार केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शाळा, पालक आणि विद्यार्थी याबाबत सध्या अतिशय सावध झाले आहेत.