पुणे - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने(एनसीएल) बायोपिलर नॅनो कोटींग असलेल्या मास्कची निर्मिती केली आहे. एनसीएलने पेटंट घेतलेल्या जीवाणुच्या सेल्युलोजचा वापर या नॅनो कोटींगमध्ये केला आहे. डॉ. सय्यद दस्तगिर, डॉ. महेश धारणे आणि डॉ. शुभांगी उंबरकर यांनी विशेष संशोधन करुन हा मास्क तयार केला आहे.
या मास्कमध्ये सेल्युलोज द्रवाचा आणि इतर काही महत्त्वपूर्ण घटकांचा वापर केला गेला असून तो बाहेरील विषाणूंना बाहेरच थोपवण्याचे काम करतो. 'अमेरिकन सोसायटी ऑफ टेस्टिंग अॅण्ड मटेरियल'च्या मास्क संरक्षण मानकांनुसार जीवाणू फिल्टरेशनची कार्यक्षमता तपासणीसाठी स्टेफीलोकोकस ऑरियस या मानवी रोगाचा प्रयोग केला. तेव्हा या मास्कची क्षमता ही 99.9 टक्के इतकी निदर्शनास आली. त्यामुळे दक्षिण भारत वस्त्र संशोधन संस्थेने (सिट्रा) याला मान्यता दिली आहे.
सर्वसामान्यांना हे मास्क उपलब्ध होण्याकरता एनसीएलने सेट लॅब इंडिया या लघु, मध्यम कंपनीला हे मास्क तयार करण्याकरता तंत्र उपलब्ध करुन दिले आहे. येत्या काही दिवसात एक लाख मास्क तयार करण्याचा मानसही या कंपनीले ठेवला असून एन-95 मास्कच्या तुलनेत या मास्कचे दरही सर्वसामान्यांना परवडेल इतकेच असणार आहेत.