बारामती - काटेवाडी येथील शेतकऱ्याची 3 व्यापार्यांकडून सव्वा पाच लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शेतकरी रणजीत दळवी यांनी तालुका पोलीस ठाण्यात संबधीत व्यापाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
२ सप्टेंबर २०१९ रोजी रणजीत दळवी यांनी आपल्या शेतातील 12 टन डाळिंब ४८ रुपये किलो दराने अण्णासाहेब खोपडे, राहुल काळे ( रा. सणसर ता. इंदापूर ), अस्लम शेख (रा. कल्याण. सदानंद चौक, मुंबई ) या व्यापाऱ्यांना विकत दिले होते.
मालाची एकूण ५ लाख ७६ हजार इतकी रक्कम झाली. ठरलेल्या व्यवहारानुसार व्यापाऱ्यानी ५० हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले. मात्र बाकीचे ५ लाख २६ हजार वेळेवेळी मागणी करुनही देत नसल्याचे रणजीत यांनी सांगितले आहे. संबधीत व्यापाऱ्याविरोधात आर्थिक फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार ओमासे करीत आहे.