पुणे - गेल्या आठवड्यात पिंपळे सौदागर येथे प्रेम प्रकरणातून विराज विलास जगताप या वीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सहा आरोपी अटकेत आहेत. मात्र, या प्रकरणातील मुलीलादेखील आरोपी करण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
आठवले म्हणाले, की पिंपळे सौदागर येथे बौद्ध तरुणाची हत्या करण्यात आली, ही घटना गंभीर आहे. मराठा आणि दलित हे दोन समाज एकत्र आले पाहिजेत अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही हे स्वप्न होते. जातीच्या नावावर आपल्या मनात असलेली कटुता संपुष्टात आणली पाहिजे, आणि समाज एक झाला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले यांनी मांडली असल्याचे आठवले म्हटले.
या तरुणाची हत्या ही निंदनीय घटना असून, या घटनेतून जातीयवादी मानसिकता समोर आलेली आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुलाच्या नातेवाईकांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणातील मुलीने फोनद्वारे मृत तरुणाला घटनास्थळी बोलावले होते, मात्र त्या ठिकाणी ती नव्हती. तसेच, आपला आणि विराजची ओळखही नव्हती असे त्या मुलीने म्हटले आहे. याबाबतची चौकशी पोलिसांनी करावी, आणि संबंधित मुलीलाही आरोपी करावे अशी मागणी आठवले यांनी केली आहे.
हेही वाचा : 'मुख्यमंत्री कोरोनाचा सामना करू शकले नाहीत; सरकारच्या बेशिस्तपणानेच रुग्णसंख्या वाढली..'