दौंड (पुणे) - दौंड तालुक्यातील टाकळी भीमा येथील शेतकरी विकास सुभाष मेमाणे यांच्या शेतात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यामध्ये चार एकर ऊस व ड्रीपचे पाइप जळून खाक झाले. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अशी लागली आग :
मेमाणे यांच्या शेतामध्ये माहवितरणच्या तारांचे खांब आहेत. तसेच शेजारी विद्युत ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये दोष निर्माण झाल्याने त्यातून ठिणग्या उडाल्या, त्या ऊसावर पडल्या. दिवसभर कडक उन्हामुळे तापलेले ऊसाच्या पिकांनी लगेच पेट घेतला आणि पाहता-पाहता अवघा चार एकरच्या ऊसाची राख झाली. तसेच या उसाला ठिबक सिंचनद्वारे पाणी देण्यात येत होते. या आगीमध्ये ठिबक सिंचन पाइपदेखील जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहे.
हेही वाचा - पटेलांच्या रुपाने काँग्रेसने आपला 'चाणक्य' गमावला; मुख्यमंत्र्यांसह इतरांनी वाहिली श्रद्धांजली..
परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला पण ते निष्फळ ठरले. विजवितरणाच्या भोंगळ कारभारामुळेच ही आग लागली असल्याने विजवितरणाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी विकास मेमाणे यांनी केली आहे.
तोडणीला आलेला ऊस जळून खाक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मेमाने यांच्या शेतातील उसाला सातत्याने आग लागत असून ही आग लागण्याची चौथी वेळ आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी अशा घटनांमुळे मेटाकुटीला येत आहे. अशा घटनांबाबत तातडीने निर्णय होऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे गरजेचे आहे.
हेही वाचा - कामगार संघटनांच्या २६ नोव्हेंबरच्या देशव्यापी बंदला काँग्रेसचा पाठिंबा - बाळासाहेब थोरात
साखर कारखान्याकडून शेतकऱ्याला दिलासा :
याबाबत परिसरातील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना व अनुराग शुगर्स या दोन्ही साखर कारखान्यांच्या वतीने तातडीने ऊस तोड करणारी टोळी टाकून ऊस गाळपासाठी नेण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला.