पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. जिल्हा परिषदेने ही बाब गांभीर्याने घेऊन शिक्षकांच्या मदतीने शहर, गाव वस्तींवरील प्रत्येक घरातील व्यक्तीचे आजारपण, कुटुंबाची स्थिती, कुटुंबातील सदस्य संख्या याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.
खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यांत दोन महिन्यांपर्यंत कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने पुणे-मुंबई परिसरातील रेड झोनमधून अनेक नागरिक या तालुक्यांमध्ये दाखल झाले आहेत. या नागरिकांना घर व शाळांमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे.
कोरोना महामारीवर यशस्वी मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. प्रत्येक शहर, गाव वस्तीवर प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याबाबत सर्वेक्षण करण्याचे काम शिक्षक करत आहेत. शिक्षकही प्रामाणिकपणे कोरोना महामारीवर मात करण्यासाठी लढाई लढताना दिसत आहेत.