पुणे - सारथी संस्थेसमोरील अडचणी दूर करून हा प्रकल्प मार्गी लावावा. तसेच येथील तारदूतांना नियुक्त्या द्याव्यात, या मागणीसाठी गेले 17 दिवस सुरू असलेले ठिय्या आंदोलन अखेर मंगळवारी मागे घेण्यात आले. सारथी संस्थेच्या संचालक मंडळाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
सारथी संस्थेतील तारादुतांच्या प्रश्नांबाबत सुरू असलेली चौकशी ही तातडीने पूर्ण करावी, अशी विनंती सारथी संस्थेकडून सरकारला करण्याचे आश्वासन तसेच ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर तारादुतांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन संचालक मंडळाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. हे तारदूत गेल्या सतरा दिवसांपासून आंदोलन करत होते. मात्र, कोणातच निर्णय सारथी संस्थेकडून घेण्यात येत नव्हता, त्यानंतर मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, तारादूत आणि सारथी संस्थेच्या संचालकांची मंगळवारी बैठक घेण्यात आली.
सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापक अशोक काकडे, संचालक मंडळ, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर यांच्यासह तारादूत उपस्थित होते.