पुणे : पिंपरी-चिंचवडमधील जुनी सांगवी येथे भरधाव टँकरने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या सहा जणांना भीषण धडक दिल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. यानंतर टँकर चालक फरार झाला. या थरारक घटनेत जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर असून, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांगवी पोलिसांनी याबाबत माहिती दिली.
या प्रकरणी राधेश्याम बब्रुवान मुळे वय- 26 रा.आनंदनगर जुनी सांगवी, यांनी सांगवी पोलिसात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात डिझेल टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी फाटा येथून भरधाव वेगात असलेल्या डिझेलचा टँकर (एम.एच-14 एच.यू- 6872) वरील चालकाचा ताबा सुटल्याने माकन चौक जुनी सांगवी येथील रस्त्याच्या कडेला बोलत थांबलेल्या दोघांना टँकर ने भीषण धडक दिली. तसेच पुढे काही अंतरावर गेल्यानंतर फिर्यादी आणि त्यांची आई रस्त्याच्या बाजूने चालत जात होते, त्यांनाही या टँकरने धडक दिली. त्यापाठोपाठ पुढे जाऊन तो टँकर आणखी दोघांना धडकला.
अखेर चालकाने टँकर नियंत्रणात आणण्यासाठी इलेक्ट्रिक पोलला जाऊन धडक दिली. त्यानंतर टँकर थांबल्यावर चालक फरार झाला. या घटनेमध्ये एकूण 6 लोक जण जखमी झाले असून चार जणांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण करीत आहेत.