पुणे - शिक्रापूर येथील जागेची नोंद सातबारा उताऱ्यावर करून घेण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तलाठ्यासह खासगी व्यक्तीवर पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश केवलसिंग जाधव (वय 32, रा. शिरूर) व पंडित उमाजी जाधव (वय 32), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
25 हजार रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न -
तक्रारदार यांनी पत्नीच्या नावावर शिक्रापूर येथे एक गुंठा जागा घेतली आहे. या जागेची नोंद करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यावेळी शिक्रापूर सजाचे तलाठी अविनाश जाधव यांनी सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागितली. यानंतर तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. याची पडताळणी करून त्यात तडजोडीअंती 25 हजार रुपयांची लाच खासगी व्यक्ती पंडित यांच्या सांगण्यावरून मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - नागपुरात शाळकरी विद्यार्थ्याचे अपहरण करून खून