पुणे : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आत्ता स्वाभिमानी शेतकरी संघटनेत देखील फूट पडली असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पक्षश्रेष्ठींबद्दल नाराजी जाहीर केली. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात शिस्तपालन समितीची बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीला रविकांत तुपकर गैरहजर होते. तर संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे या बैठकीला उपस्थित होते. तब्बल 1 ते दीड तास झालेल्या बैठकीनंतर समितीने तुपकर यांना 15 ऑगस्ट पर्यंत त्यांनी समितीच्या समोर येऊन त्यांचे म्हणणे मांडावे, अन्यथा 5 सदस्य समिती पुढील निर्णय घेणार असल्याचे समतीचे प्रमुख जालिंदर पाटील यांनी सांगितले आहे.
15 ऑगस्ट पर्यत म्हणणे मांडावे : समितीचे प्रमुख जालिंदर पाटील म्हणाले की, रविकांत तुपकर बैठकीला आलेले नाहीत त्यामुळे फक्त राजू शेट्टी आणि प्रशांत डिक्कर यांचे म्हणणे ऐकून निर्णय देता येणार नाही. त्यामुळे 15 ऑगस्ट पर्यंत रविकांत तुपकर यांना वेळ देण्यात येत आहे. त्यांनी 15 ऑगस्ट पर्यत समिती समोर आपले म्हणणे मांडावे. जर 15 ऑगस्टलाही तुपकर आले नाहीत तर पाच लोकांची समिती त्यांच्यासंदर्भात निर्णय घेईल. तुपकर यांनी चळवळीसोबत राहावे ही सर्वांची इच्छा आहे.
तातडीची बैठक बोलावली : राजू शेट्टी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून रविकांत तुपकर यांनी वेगळी भूमिका मांडायला सुरूवात केली होती. चळवळीसाठी ती हनीकारक होती. म्हणून आज तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला त्यांना देखील आमंत्रण पाठवले होते. त्यांनी येणे अपेक्षित होत पण ते आले नाही. मी आजच्या बैठकीत सगळे खुलासे केले आहेत. तुपकर यांचा रोख माझ्यावर होता त्यामुळे हे निर्णय घेताना मी निर्णय प्रक्रियेत सहभागी होणार नाही. तसेच एक समिती आम्ही स्वाभिमानमध्ये नेमली आहे. 5 जणांची समिती नेमली असून समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल. असे देखील यावेळी राजू शेट्टी म्हणाले.
समितीसमोर जाण्यासाठी रविकांत तुपकर तयार नाहीत : तर दुसरीकडे रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यातूनच त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. शिस्तपालन समितीसमोर जाण्यासाठी रविकांत तुपकर तयार नाहीत. मात्र शिस्तपालन समितीतील वरिष्ठांना आधीच त्यांनी सातत्याने होत असलेल्या आक्षेपाबाबत माहिती दिली होती. त्यामुळे शिस्तपालन समितीकडे जाणे शक्य नसले, तरी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राहूनच शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे, अशी भूमिका तुपकर यांनी स्पष्ट केली आहे.
हेही वाचा -