पुणे: पुणे रेल्वे स्थानकात संशयास्पद वस्तू सापडली. ती वस्तू बॉम्बसदृश्य नसल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली होती. मात्र नंतर पोलिसांनी ही वस्तू ताब्यात घेतली आणि. नंतर बी जे मेडिकल कॉलेजच्या खुल्या मैदानात ही वस्तू आणण्यात आली. बॉम्बनाशक पथकाने आजूबाजूचा परिसर रिकामा केला. पन्नास ते साठ फूट अंतरवर एक वायर या वस्तूला लावण्यात आली. आजुबाजुला दगड मातीने भरलेले पोते ठेवले. तेथे स्फोट घडवून आणण्यात आला, त्यानंतर एक मोठा आवाज झाला आणि ही वस्तू निकामी करण्यात आली.
पुणे रेल्वे स्टेशनवर सकाळी १०:३५ वाजण्याच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक रघुवंशी यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे कांबळे यांना दुरध्वनीव्दारे कळविले की, पुणे रेल्वे स्टेशन येथील जनरल रिझर्वेशन काउंटर समोरील मोकळया जागेमध्ये जुन्या आगमन प्रवेशव्दाराजवळ संशयित वस्तु दिसत आहे. बॉम्बशोधक व नाशक पथक, लोहमार्ग पुणे, रेल्वे सुरक्षा बल, पुणे शहर पोलीस तसेच या सर्व विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या उपस्थित संशयित वस्तुची बॉम्बशोधक व नाशक पथक व श्वान पथकाकडुन तपासणी केली यात कोणत्याही प्रकारचा स्फोटक पदार्थ नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते. मात्र संबंधित वस्तुंची अधिक तपासणी करण्याकरिता व ती वस्तु निष्क्रिय करण्याकरिता मेडीकल कॉलेजच्या मैदानावर स्फोट घडवुन ती वस्तु निकामी करण्यात आली. अंतिम तपासणीच्या निष्कर्षानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.अशी माहिती यावेळी लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा : पुणे रेल्वे स्थानकात आढळलेली वस्तू स्फोटक नाही; पोलीस आयुक्तांची माहिती