पुणे - बांगलादेशमधील दहशतवादी गटाच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून पश्चिम बंगालच्या नागरिकाला चाकणमधून अटक करण्यात आली. शर्यत मंडल असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. बिहार आणि महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
बिहार एटीएसने बुधवारी पटना जंक्शन रेल्वे स्टेशनजवळ खैरुल मंडल आणि अबू सुलतान या दोघांना संशयावरून अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय संरक्षण दलांशी संबंधित काही कागदपत्र मिळून आली. यामध्ये पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्कराची तैनाती आणि इसिसशी संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे. त्याप्रमाणेच हे दोघे बांगलादेशच्या जेनाईदहा जिल्ह्यातील रहिवासी असून, ते जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश आणि इस्लामिक स्टेट बांगलादेश या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे बिहार एटीएसच्या तपासात समोर आले आहे.
पुण्यातील चाकण परिसरात बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या मंडल याला दोन्ही बांगलादेशी संशयित दहशतवाद्यांनी त्यांच्या संघटनेसाठी युवकांना भरतीचे काम करण्याची विनंती केली होती. त्यासाठी ते शर्यत मंडल याच्याशी नियमित संपर्कात होते. त्यामुळे बिहार एटीएसने मंडल याला महाराष्ट्र एटीएसच्या पुणे पथकाच्या मदतीने गुरुवारी चाकण परिसरातून ताब्यात घेतले. संशयिताला गुरुवारी पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी बिहार एटीएसच्या वतीने संशयित आरोपीच्या प्रवास कोठडीची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने त्याला बिहारमध्ये चौकशीसाठी नेण्यासाठी १ एप्रिल पर्यंत प्रवास कोठडी मंजूर केली आहे.