पुणे : पुण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी त्या बोलत होत्या. या नोटीसमध्ये सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्यावर 3 रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला असे सांगितले. तसेच पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होत नाही म्हणून न्यायालयाच्या माध्यमांतून गुन्हा दाखल करण्यात यावा असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
अंधारेंनी दिले हे कारण : यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, माझ्या दृष्टीने एखाद्याकडे कोट्यवधी रुपये जरी असले आणि त्यांच्याकडे संस्कार नसले तर ती व्यक्ती कफल्लक आहे. अश्या व्यक्तींची ऐपत बघून दावा दाखल करायचा असतो आणि म्हणून मी 3 रुपयाचा दावा दाखल केला आहे. दुसरी गोष्ट अशी की, मध्यमवर्गीय लोकांकडे जपायला फक्त आब्रु असते आणि त्याची किंमत होऊ शकत नाही. म्हणून देखील मी 3 रुपयांचा दावा ठोकला आहे.
3 रुपयांचाच दंड का, जाणून घ्या कारण : शिवसेना उपनेत्या अंधारे पुढे म्हणाल्या की, मी जेथून येते तो समाज म्हणजे भटक्या विमुक्त जातीचा समाज असून या समाजात 3 रुपयांच्या दंडाला खूप महत्त्व आहे. यात 3 रुपयांचा दंड कोणाला लावतात तर ज्याला महिलेचे महत्त्व कळत नाही आणि जो माणूस नव्हे तर जनावर समजला जातो. अश्या व्यक्तीवर 3 रुपयांचा दंड ठोठावला जातो. म्हणून मी शिरसाट यांच्यावर 3 रुपयांचा दावा ठोकला आहे, असे देखील यावेळी अंधारे म्हणाल्या.
काय म्हणाल्या अंधारे? - अंधारे पुढे म्हणाल्या की, आज राज्यात अमृता फडणवीस तसेच शीतल म्हात्रे यांच्याबद्दल कोणी काहीही बोलले की लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. पण मागील काही दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे एका महिलेच्या बाबतीत वारंवार बेताल वक्तव्य करीत आहेत; पण हे सरकार कोणत्याही प्रकारची पावले उचलत नाही. गुन्हा दाखल करत नाही; म्हणून मी आज न्यायालयाच्या माध्यमातून गुन्हा दाखल व्हावा म्हणून नोटीस देखील पाठविली आहे, असेदेखील यावेळी अंधारे म्हणाल्या.