पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी एक मोठी घोषणा केली. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड केली. यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
'राष्ट्रवादी लोकशाहीने चालणार पक्ष' : सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आहे, त्यासाठी मी पक्षाचे आभार व्यक्त करते. दिल्लीत मी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना तर राज्यात छगन भुजबळ आणि अजित पवार यांना रिपोर्ट करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दडपशाहीवर नाही तर लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे.' त्या आज पुण्याच्या कोथरूड येथील गांधी भवन येथे बोलत होत्या.
'पक्षात निर्णय सगळ्यांना विचारूनच होतात' : कार्यध्यक्ष पदासाठी अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांची लॉबिंग केल्याच बोललं जात आहे, यावर त्या म्हणाल्या की, 'राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष लॉबिंगनी चालत नाही. या पक्षात चर्चा होते. या पक्षात लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. इथे जे निर्णय होतात ते सगळ्यांना विचारूनच होतात. अजित पवार यांना पक्षाने कोणती जबाबदारी दिली असे विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार हे राज्यातील विरोधी पक्ष नेते आहेत. हे पद मुख्यमंत्र्यांसारखच असतं. राज्यात मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते या दोघांची भूमिका मोठी असते.
'संसदरत्न मला वडिलांमुळे मिळत नाही' : सुप्रिया सुळे यांची निवड घराणेशाही मुळे झाली असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'मला हे मान्य आहे की घराणेशाही आहे. माझा ज्या घरात जन्म झाला आहे त्याचा मला अभिमान आहे. शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. जे टिका करत आहेत त्यांना त्यांच्या पक्षातील घराणेशाही मी संसदेत दाखवून दिली आहे. जेव्हा मला संसदरत्न पुरस्कार मिळतो तेव्हा तो मला माझे वडील देत नाहीत.'
हेही वाचा :