बारामती- भावकीतील विवाहित अल्पवयीन मुलीसोबत फोटो काढून तिला लग्न कर नाही तर तुझ्यावर बलात्कार करीन अशी धमकी देण्यात आली. त्यातून तिने विषारी औषध घेतले आणि आत्महत्या केली. या प्रकरणी आकाश मुरलीधर कारंडे, उज्ज्वला मुरलीधर कारंडे व मुरलीधर कुंडलिक कारंडे (रा. कारंडेमळा, मोराळवाडी, ता. बारामती) या तीन जणांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या वडिलांनी सांगितली संपूर्ण हकीकत - वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुलगी माहेरी आली असताना दि. २८ मार्च रोजी विषारी किटकनाशक घेतले होते. उपचारादरम्यान तिचा दि. ३० रोजी पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. भावकीतील मुलगा आकाश हा त्यांच्या मुलीची छेड काढत होता. यासंबंधी त्यांनी ६ नोव्हेंबर २०१९ रोजी आकाशच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आकाशकडून होणाऱ्या त्रासामुळे तिचे जून २०२० मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार गावी नात्यातील तरुणाबरोबर विवाह लावून देण्यात आला. तेव्हापासून ती सासरीच नांदत होती. सहा महिन्यांपूर्वी आईच्या आजारपणावेळी मोराळवाडीत आली असताना आकाश याने, तू मला मोबाईल नंबर व सासरचा पत्ता दिला नाही तर मी तुझ्या भावाला मारून टाकीन आणि तुझ्या सासरच्या घरी येवून आत्महत्या करेन अशी धमकी देत जबरदस्तीने मोबाईल क्रमांक घेतल्याचे सांगितले. त्यानंतर तो दोनदा सासरी घरी कोण नसताना येवून गेल्याचेही सांगितले. दि. २८ रोजी फिर्य़ादी पत्नीला घेवून मोरगावला दवाखान्यात गेले होते. दुपारी ते आले असताना गोठ्यात ही मुलगी निपचित पडली होती. तिथे किटकनाशकाची बाटली व एक चिठ्ठी आढळून आली. फिर्यादीने तिला तातडीने मोरगाव व तेथून ससून रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु दि. ३० रोजी उपचारादरम्यान ती मृत झाली.
तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या सुईसाईड नोटमध्ये सांगितले कारण - चिठ्ठीत तिने आकाश हा लग्न कर नाही तर तुझ्यावर बलात्कार करेन अशी धमकी देत असल्याचे नमूद केले होते. तसेच त्याची आई व वडील हे तू आमच्या मुलासोबत लग्न केले नाही तर तो मरून जाईल असे म्हणत त्रास देत असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे अधिक तपास करत आहेत.