पुणे - बाजारातील पुरवठा आणि उत्पादन यांचा विचार करून कारखान्यांनी साखरेच्या ऐवजी इथेनॉलसारखे उपपदार्थ तयार करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनाकडे वळावे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र स्टेट सहकारी बँकेच्या माध्यमातून पुण्यात तीन दिवस सुरू असणाऱ्या “साखर परिषद 20-20”चा समारोप रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झाला. त्यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते.
साखर कारखानदारासमोर साखरेचे अधिकचे उत्पादन ही मोठी समस्या आहे. साखर कारखाने हे महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन आहे. देशात पाण्याची कमतरता नाही, मात्र त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. पाण्याचा अतिरिक्त वापर हा सामाजिक गुन्हा आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनावर आणण्याची आवश्यकता आहे, असेही गडकरी म्हणाले आहेत.