पुणे - दरवर्षी मे आणि जून महिन्यात पाणी कपातीची टांगती तलवार असलेल्या पुणेकरांची यंदा मात्र चिंता मिटली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 पैकी 3 धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी पेक्षा साडेचार टीएमसी जास्त पाणीसाठा यंदा खडकवासला साखळी क्षेत्रात असून एकूण 10.42 टीएमसी पाणीसाठा आहे.
टेमघर धरणाचे दुरुस्तीचे काम सुरु असून धरण पूर्णपणे खाली करण्यात आले होते. त्यामुळे पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या तिन्ही धरणांचा मिळूनच पाणीसाठा 10.42 टीएमसीवर गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तालुक्यांना 2 आवर्तने दिली जातील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या 4 प्रमुख धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी टेमघर धरण दुरुस्तीसाठी यापूर्वीच रिकामे करण्यात आले आहे. उर्वरित 3 धरणांमध्ये 10 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पानशेत धरणात 4.92, वरसगाव धरणात 4.17 टीएमसी आणि खडकवासला धरणात 1.31 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. तसेच गेल्या वर्षीपेक्षा यंदा तब्बल साडेचार टीएमसी पाणीसाठा जास्त आहे.
दरवर्षी जलसंपदा विभागाकडून उन्हाळ्यात धरणांमधील पाण्याचे नियोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाही उपलब्ध पाणीसाठय़ाचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा मुबलक पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात ग्रामीण भागासाठी 2 सिंचन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेला प्रतिमहिना 1.25 टीएमसी पाण्याची गरज आहे. धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन, पाणीगळती, पाणीपुरी आणि पाऊस लांबल्यास नियोजनानुसार काही पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे. या बाबी लक्षात घेतल्या तरीदेखील पाऊस सुरू होईपर्यंत धरणांमध्ये अडीच ते तीन टीएमसीपर्यंत पाणीसाठा शिल्लक राहणार आहे.