पुणे : पुण्यातील वनभवन येथे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, मामा-भाचे कधी आमच्या पक्षात येतील माहिती का नाही, हे माहिती नाही. त्यांनीदेखील तसे काही सांगितले नाही, असेदेखील यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले. तरीही बाळासाहेब थोरात आमच्या पक्षात आले तर त्यांचे निश्चितच स्वागत करू, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
विरोधाला विरोध करून काहीही होत नाही : गेल्या काही दिवसांपासून बारामती मतदारसंघाला भाजपकडून टार्गेट केला जात आहे. यावर मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, कुठल्याही निवडणुकीला सामोरे जायचे असेल तर काम जरूरी असते. बारामतीच्या कार्यकर्त्यांना तेच सांगितल आहे की, बारामती जे चांगल आहे त्याचे अनुकरण केलेच पाहिजे, असेदेखील यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच, आज मी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांना हे सांगितले की, काम केल्याने जनतेसमोर जाता येते आणि वर्षभर काम केले तर मतदानाच्या दिवशी लोकं त्याचा विचार करीत असतात विरोधाला विरोध करून काहीही होत नाही आणि हेच आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिकवले आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला फटका : नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला फटका बसला आहे. यावर मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, विधान परिषदमध्ये पराभव झाला. त्याचे विश्लेषण करीत आहे. कुठे चुकले त्याच विश्लेषण करू. नियोजनात त्रुटी राहिली असल्याची शक्यता आहे. तसेच, आता कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत आम्ही विजयी होऊ कारण ससा एखाद्या वेळेस थांबला याचा अर्थ कासवाचा वेग वाढला असा होत नाही. असेदेखील यावेळी मुनगंटीवार म्हणाले.
कसबा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत भाजपचे उमेदवार : कसबा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत भाजपचे इच्छुक उमेदवार बिडकर आणि धीरज घाटे हे नाराज असल्याचे सांगितले जातं आहे. यावर मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, कसब्यात कोणीही नाराज नाही. मी धीरज घाटे आणि गणेश बीडकर यांच्याशी बोललो आहे. ते कामालादेखील लागले आहेत. उद्या माझ्या उपस्थितीत प्रचार नारळ फोडला जाणार आणि आम्ही कसबा आणि चिंचवड दोन्ही पोटनिवडणूक विक्रमी मताने जिंकू, असा विश्वासदेखील यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीचे मायावी रूप समजून घ्यावे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून सांगितले जात आहे. यावर मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, आमच्याही पक्षांनी या महाविकास आघाडीचे मायावी रूप समजून घेतले पाहिजे हे खूप मायावी आहेत. हे तेव्हा पत्रकारांना सोबत घेतात पत्रकारांमध्ये अशा पद्धतीचा भाव व्यक्त करतात की, आता या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे आमचा आग्रह आहे या मायावी नेत्यांना बळी कधीच पडू नये. आपल्याला मुंबईच्या वेळी भावनेत राहिलो, लढलो असतो तर जिंकलो असतो, असेदेखील यावेळी मुनगंटीवार म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर टीकास्त्र : आज शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका व्यक्त केली आहे. यावर मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, आपल्या देशात न्यायव्यवस्था आहे. या दोन बाजू आहेत, तर्कवितर्क आहेत, तुम्हीच सगळे ठरवता हे योग्य नाही. योग्य-अयोग्य काय तुम्ही ठरवाल का? शिवसेना मग उद्धव ठाकरे यांच्या दोन भावांची पण आहे ना असेदेखील यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले.
आदित्या ठाकरेंच्या सुरक्षेबाबत व्यक्त केले प्रश्नचिन्ह : आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, माझी सुरक्षा काढली त्यावेळी पण मी तेच सांगत होतो, सुरक्षा देणं ठरवणे यासाठी समिती आहे. ती समिती मूल्यांकन करून ठरवते. आम्हीच ठरवले तर कस होणार. माझीही सुरक्षा काढली होती, त्यामुळे तुमची दुटप्पी भूमिका आहे का? जरी आदित्य ठाकरे यांना सुरक्षा देण्यासाठी मागणी होत आहे तर सुरक्षा देण्यासाठी एक समिती असते ती मूल्यांकन करून ठरवते. माझी सुरक्षा जेव्हा काढली होती तेव्हा अजित दादा यांनी टीका केली होती. आता हे आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षा मागत आहेत म्हणजे हा कुठला दुटप्पीपणा, याला तर पॉलिटिकल अल्झेमर म्हणायला हवे, असेदेखील यावेळी मुनगंटीवार म्हणाले.
हेही वाचा : Rahul Gandhi : पंतप्रधानांकडून अदानींचे संरक्षण! राहुल गांधींचा मोदींच्या भाषणावर पलटवार