पुणे - प्रतिष्ठीत फिरोदिया करंडकाच्या विषय निवडीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. हिंदू-मुस्लीम, भारत-पाकिस्तान, जम्मू-काश्मीर, आर्टिकल 370, अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशिद प्रकरण या सर्व विषयांचे सादरीकरण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दोन समाजात, जाती-धर्मात, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या विषयांना मज्जाव करण्यात आला आहे. यासंदर्भात कोणी सादरीकरण केले, तर त्याला पारितोषिक दिले जाणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
फिरोदिया करंडक हा आंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रतिष्ठेचा करंडक आहे. स्वप्नभूमी संस्थेच्या माध्यमातून गेल्या 46 वर्षांपासून या करंडकाचे आयोजन केले जाते. माञ, यापूर्वी सादरीकरणाच्या विषय निवडीवर कोणतेही नियम, अटी, शर्थींचे बंधन नव्हते. मात्र, यंदापासून हे निर्बंध घालण्यात आले आहेत. या माध्यमातून कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळचेपी करण्याचा हेतू नसल्याचे आयोजक अजिंक्य कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
हे वाचलं का? - पुण्यात ६७ व्या 'सवाई गंधर्व' महोत्सवाला आजपासून सुरुवात
समाजामध्ये सध्या संवेदनशील विषयांवर चर्चा सुरू आहे. सादरीकरणामध्ये तोच तोच विषय येत आहे. त्यामुळे नवीन विषयांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयीन वयात संवेदनशील विषयावर भाष्य करण्याची समज नसते. त्याचबरोबर साहित्य आणि सादरीकरणामध्ये फरक असल्याचे कुलकर्णी म्हणाले.