पुणे - राज्यातील विद्यापीठांमध्ये कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. मात्र बीपीएड आणि एमपीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्रता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फिटनेस टेस्ट द्यावी लागत आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मैदानावर जाऊन फिटनेस टेस्ट देणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आता कोरोना संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून विद्यार्थी एकत्र जमणार आहेत त्यामुळे संसर्गाची भीती आणि तणाव विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
फिटनेस टेस्टची समस्या
कोरोना संकटातून मार्ग काढण्यासाठी विविध परीक्षा ऑनलाइन घेतल्या जात आहेत; मात्र बीपीएड आणि एमपीएडसाठी विद्यार्थ्यांना फिटनेस टेस्ट द्यावी लागत आहे. शारीरिक शिक्षक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी फेब्रुवारीपर्यंत मैदानावर जाऊन फिटनेस ठेवत होते. मात्र लॉकडाऊननंतर तब्बल सहा ते सात महिने हे विद्यार्थी घरात बसून आहेत; त्यामुळे फिटनेससाठीची तयारी ते करू शकले नाहीत. स्पर्धात्मक पातळीवर आवश्यक असलेला फिटनेस त्यांना करता आला नाही, त्यामुळे आता फिटनेस टेस्ट देणे ही मोठी समस्या या विद्यार्थ्यांसमोर उभी आहे.
प्राध्यापकांनाही संसर्गाची भीती
महाराष्ट्राच्या आठ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होते आहे. त्यासाठी आठ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत आणि दोन हजार जागांसाठी ही परीक्षा होते आहे. एका सेंटरवर तब्बल आठ दिवस ही परीक्षा चालणार आहे. एमपीएडची परीक्षा 29 ऑक्टोबरला आणि बीपीएडची परीक्षा 4 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर पुढचे 3 ते 4 दिवस फिटनेस टेस्ट सुरू होणार आहेत. मैदानावर विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणे, विद्यार्थ्यांची फिटनेस घेणे यामुळे संसर्गाचा धोका असल्याचे प्राध्यापकांचे देखील मत आहे. या संदर्भात प्राध्यापकांच्या संघटनेकडून परीक्षा संदर्भात उपाय सुचवण्यात आले; ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मागील वर्षाच्या फिटनेसवर आधारित गुण द्यावे किंवा ऑनलाइन परीक्षा घ्याव्या, असे सुचवण्यात आले. फिटनेस टेस्ट न घेता विद्यार्थ्यांकडे प्रमाणपत्र आहेत, त्यांचा विचार करून गुण द्यावे, असे विविध पर्याय सुचविण्यात आले होते.