पुणे - येथील 'एफटीआयआय'च्या ४ विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्कात वाढ करण्यात आल्याने बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
पुण्यातील 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. सण २०१३ पासून शैक्षणिक शुल्कात प्रत्येक वर्षी १० टक्के वाढ केली जात आहे. याशिवाय २०१५ पासून प्रवेश शुल्कातही वाढ केली जात आहे. ही वाढ कमी करण्यात यावी, या मागणीसाठी एफटीआयआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या ४ विद्यार्थ्यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
हेही वाचा - पुण्यातील कोंढव्यात सात मजली इमारतीला भीषण आग
२०१३ पासून प्रत्येक वर्षी शैक्षणिक शुल्कात १० टक्के वाढ केली जाते. त्यामुळे २०१३ मध्ये जे शैक्षणिक शुल्क ५५,३८० होते ते २०२०२ मध्ये १,१८,३२३ पर्यंत पोहोचेले. त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कामध्येही २०१५ पासून वाढ केली जात आहे. २०१५ मध्ये प्रवेश शुल्क १५०० रुपये होते. ते आज १० हजारांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा दरवाढीचा बोजा सहन करावा लागत आहे. गेल्या ३ वर्षांपासून ही बाब सतत एफटीआयआय प्रशासनाच्या लक्षात आणून देऊनसुद्धा त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे या विद्यार्थ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
ही शुल्कवाढ थांबवण्यात यावी आणि जोपर्यंत प्रवेशशुल्क कमी होत नाही तोपर्यंत प्रवेशप्रक्रिया थांबवावी. अन्यथा उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.
हेही वाचा - कुस्तीप्रेमींसाठी खुशखबर..! ६३ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा पुण्यात