बारामती (पुणे) - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका फोन कॉलमुळे आरोग्य सेवक पदाची परीक्षा देण्यासाठी दापोलीला गेलेल्या युवकाला परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश मिळाला. ढेकळवाडी (ता. बारामती) येथील महेश लकडे या युवकाचे नाव आहे. आरोग्य सेवक पदाच्या भरतीसाठी वराडकर महाविद्यालय दापोली येथे त्याची परीक्षा होती. मात्र, दापोली येथे गेल्यानंतर तेथील पर्यवेक्षकांनी ‘येथे तुझी परीक्षा नाही. त्यामुळे तुला बसता येणार नाही, असे सांगितले. मात्र, यानंतर पवार यांचे स्वीय सहायक सुनिल मुसळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोन कॉलमुळे अवघ्या दहा मिनिटात महेशला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला. मात्र, त्याचे प्रवेश पत्र पाहिल्यानंतर तेथील पर्यवेक्षकांनी इथे तुझी परीक्षा नाही, हे केंद्र तुझे नाही त्यामुळे आता तुला परीक्षा देता येणार नाही, असे स्पष्ट केले.
अजित पवारांच्या सूचना -
महेश लकडे याची ही कहाणी तशी पाहिल्यास अगदी इतरांसाठी फारशी गंभीर नसेल. मात्र, त्याच्या दृष्टीने ती फारच महत्त्वाची खूप मोठी स्वप्न घेऊन गेलेल्या महेशला हे सगळे अनपेक्षित होते. त्यामुळे त्याच्या पायाखालची वाळू सरकली. थोड्याच वेळात त्याने काटेवाडी येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर संपर्क साधून, तेथे ही माहिती दिली. तेथील लोकांनी त्यास सुनिलकुमार मुसळे यांना संपर्क करण्यास सांगितले. त्याने मुसळे यांना संपर्क साधून सर्व माहिती सांगितली. त्यानंतर फक्त दहा मिनिटात सगळी चक्रे फिरली. मुसळे यांनी अजित पवार यांना कल्पना देऊन, रत्नागिरीतील निवासी उपजिल्हाधिकारी यांना संपर्क साधला व हे प्रकरण गंभीर असल्याने त्या तातडीने लक्ष घालावे, असे सांगितले. त्यानंतर संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांनी देखील तातडीने चक्रे हलवली. स्वत: दापोली महाविद्यालयात जाऊन तेथील वस्तुस्थिती समजून घेतली.
अवघ्या दहा मिनिटात प्रवेश मिळाला -
मला माहित होते, कितीही अडचणी आल्या तरी अजितदादांना फक्त एक फोन केला, तर यातून मार्ग निघेल याची मला खात्री होती. एवढ्या दूरवर आल्यानंतर, परीक्षा केंद्र सापडल्यानंतर देखील तिथे प्रवेश मिळत नव्हता. त्यामुळे मला काय करावे ते सुचत नव्हते. मात्र, मुसळेसाहेबांनी यातून लगेच मार्ग काढला आणि अवघ्या दहा मिनिटात मला प्रवेशही मिळाला, अशी प्रतिक्रिया परीक्षार्थी विद्यार्थी महेश लकडे यांनी दिली.
हेही वाचा - पुण्यात शाळा महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद