पुणे (मावळ) Struggle For Daughter Education: मूळचे कर्नाटक येथे राहणारे चव्हाण कुटुंब काही वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात सोलापूरला गेले होते. मात्र, त्यानंतर लॉकडाउन लागल्यानं हातचं कामही गेलं. त्यानंतर हे कुटुंब कामाच्या शोधात पुण्यात आलं. त्यानंतरही काम मिळालं नाही. त्यामुळं कुटुंबानं रस्त्यावरच आपला संसार थाटत छोटा व्यवसाय सुरू केला. गेल्या दोन वर्षांपूर्वी पुण्यातून हे कुटुंब आणि आता मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे आले. राजू चव्हाण आणि त्यांच्या पत्नी शुन्नू चव्हाण यांना एक पाच वर्षांची मुलगी जान्हवी आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यांवरच त्यांचं वास्तव्य आहे. रस्त्याच्या कडेला महानगरपालिकेचे अधिकारी बसू देत नव्हते. त्यामुळे आता रस्त्यावर फिरत्या स्वरूपात राजू चव्हाण डेकोरेशनच्या छोट्या मोठ्या वस्तू विकतात. तर शुन्नू चव्हाण आणि जान्हवी गार्बेज बॅगा विकतात.
पैशासोबत कागदपत्रही महत्त्वाचे: रोजच्या कमाईवर चव्हाण कुटुंबाचे पोट अवलंबून आहे. चव्हाण कुटुंबीयांसोबतच त्यांचे अन्य नातेवाईकदेखील त्यांच्यासोबत छोटा-मोठा व्यवसाय करत रस्त्यावरच त्यांनी आपला संसार मांडला आहे. संसाराचा गाडा ओढण्यासाठी राजू चव्हाण आपल्या पत्नीसह तळेगाव परिसरामध्ये नगरपालिकेच्या इमारत जवळ रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसून गार्बेज बॅग आणि गणपती डेकोरेशनच्या छोट्या-मोठ्या वस्तू विकून संसार चालवित आहेत. मात्र, हलाखीच्या परिस्थितीतदेखील त्यांना आपल्या मुलीला शिक्षण द्यायचं आहे. रोजच्या कमाईतून दोन वेळच्या जेवणाचे देखील त्यांचे हाल होत आहेत. या काळ्या प्लास्टिक बॅग विक्री करून पोटासाठी मिळणाऱ्या कमाईतील किमान दीड-दोनशे रुपये राजू चव्हाण आपल्या जान्हवीच्या शिक्षणासाठी जमा करत आहेत. एखाद्या दिवशी धंदा झाला नाही, तर वडापाव आणि चुरा हेच आमचे जेवण, असे शुन्नू चव्हाण सांगतात. मात्र, असे असतानादेखील या कुटुंबानम आपल्या मुलीला आपल्या सारखेच रस्त्यावरील जीवन आणि कष्ट भोगावं लागू नये म्हणून तिला शिक्षण देण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यासाठीच ते दिवस-रात्र काम करून आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पै पै जमा करत आहेत. मात्र, शिक्षणासाठी नुसता पैसा असणे गरजेचे नसते. मुलीला शाळेत घालण्यासाठी त्यांच्याकडे वास्तव्याचा पुरावा आणि इतर कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना संघर्ष करावा लागतोय.
कागदपत्रे आणायचे कुठून? राजू चव्हाण आणि शुन्नू चव्हाण यांना आपल्या मुलीला पुढच्या वर्षी शाळेत टाकायचे आहे. त्यासाठी त्यांनी तळेगाव मधील अनेक सरकारी शाळांमध्ये चकरा मारायलादेखील सुरुवात केली आहे. मात्र, कागदपत्रांच्या अभावी मुलीला शाळेत घेण्यास कुणीही तयार होत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर राहण्यासाठी डोक्यावर छप्पर नाही. रस्त्यावर संसार अशा परिस्थितीत रहिवासी दाखला, आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रे आणायचे कुठून? असा प्रश्न राजू आणि शुन्नू चव्हाण यांच्या पुढे निर्माण झाला आहे.
जान्हवीला शाळेत जाण्याची हौस: दुसरीकडे जान्हवी ही रोज सकाळी रस्त्यावरून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना स्कूलबसमधून शाळेत जाताना बघते. त्यांच्या सारखचं आपणही शाळेत जाऊ, असं आई-वडिलांना नेहमी सांगत असते. लहान मुलीची शिक्षणाची हौस पूर्ण करण्यासाठी तिचे आई-वडील तिला आतापासूनच रद्दीतील पुस्तके आणून देत असतात. जान्हवीदेखील त्या पुस्तकांना चाळत असते. यातून तिला चित्रांचा लळा लागला आहे. जान्हवीला शिकायला शाळेत पाठवायची तयारी तिचे आई-वडील गेल्या दीड दोन वर्षांपासून करीत आहेत. तिच्यावर पुस्तकांचे संस्कार करून आवड निर्माण करत आहेत. मुलीच्या शिक्षणासाठी शाळेची फी, कपडे, पाटी, पुस्तके, वह्या आणि तिच्यासाठी एक बॅग घेण्यासाठी राजू आणि शुन्नू दिवसरात्र काबाडकष्ट करत पैसा जमवत आहेत. मात्र तरीही या चिमुकलीला शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे.
'बेटी पढाओ'चा नारा कधी खरा ठरणार? राजू आणि शुन्नू चव्हाण यांचे स्वप्न आहे की, त्यांची मुलगी जान्हवीने शिक्षण घेऊन मोठं अधिकारी बनावं. जेणेकरून त्यांच्या आयुष्यात आलेली काबाडकष्ट तिला भोगावं लागणार नाही. यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र शिक्षणासाठी या कुटुंबाला चकरा माराव्या लागत आहेत. देशात 'बेटी बचाओ'चा दिलेला नारा जरी खरा ठरला असला तरी 'बेटी पढाओ'चा नारा कधी खरा ठरणार? जान्हवी आणि तिच्यासारख्या रस्त्यावर आयुष्य जगणाऱ्या असंख्य मुलींना शिक्षणाचा हक्क मिळणार का? तो कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर समाजातील काही प्रतिष्ठित नागरिक पुढाकार घेऊन अशा मुलींच्या शिक्षणासाठी पुढे येतील, असादेखील त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा: