पुणे - शहरात संचारबंदी असतानादेखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता पोलिसांनी 20 एप्रिल दुपारी दोनपासून "कडेकोट कर्फ्यू" लागू केला आहे. अत्यावश्यक सेवांची दुकानेदेखील काही तासासाठी उघडी राहणार असून, त्यात ऑनलाइन आणि घरपोच सेवा देण्याच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. तर, अत्यावश्यक सेवा वगळता पुणे पोलिसांनी दिलेले पासेस रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात आता याची कडेकोट अंमलबजावणी केली जाणार आहे. सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यापूर्वी शहरात संचारबंदी केली होती. मात्र, तरीही शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकही विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे प्रमाण अधिक आहे. प्रशासन कोरोनाच्या संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे. मात्र तरीही शहरातील रुग्ण संख्या थांबविण्यात यश येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे, पोलिसांकडून विनाकारण फिरणारे, मास्क न घालणारे तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तीव्र कारवाई केली जात आहे. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने शहरात आज(सोमवारी) दुपारी 2 वाजल्यापासून पुढील 7 दिवस म्हणजेच 27 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत कडक कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
यामध्ये पहिल्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर काही प्रमाणात बदल केले आहेत. पालिकेने रविवारी रात्री 12 पासूनच शहर "सील" केले आहे. आता पोलिसांनी शहरात कर्फ्यू लागू केला असून, यापुढे घराबाहेर पडणे नागरिकांसाठी धोक्याचे ठरणार आहे. आरोग्य, अत्यावश्यक सेवा आणि गरज असणाऱ्यांना पुणे पोलिसांनी पासेस दिले होते. त्यात जवळपास दीड लाख जणांना पासेस दिले होते. मात्र आता या आदेशानुसार मेडिकल, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना यातून मुभा असणार असून पुणे पोलीसांनी दिलेले पासेस चालणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
जीवनावश्यक वस्तू व सेवा (दूध व दुग्धोत्पादन, किराणा माल, फळे व भाजीपाला) पुरविणारे केंद्र दिवसभरात केवळ चार तास म्हणजेच सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरू असतील. ई-कॉमर्स द्वारे घरपोच किराणा माल, फळे व भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यासाठी फ्लिपकार्ट, अमेझॉन तसेच इतर ऑनलाईन सेवा देणाऱ्या उद्योगांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत कामे करता येणार आहेत. त्याच वेळेत त्यांनी सेवा द्यायची आहे. तसेच, खाद्यपदार्थ वितरण करण्यासाठी बिग बास्केट, स्विगी, झोमॅटो तसेच इतर ऑनलाइन सेवा देणारे उद्योगांना सकाळी 10 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सेवा देता येणार आहे. त्यात केवळ अत्यावश्यक व तातडीची औषधे ग्राहकांना घरपोच देण्यासाठी सूट असणार आहे.