पुणे - शहरातील औंध परिसरात आयटीआय रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची चोरी केली जात असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून यामध्ये ४ ते ५ व्यक्ती भटक्या कुत्र्यांना चोरून नेत असल्याचे दिसत आहे.
शहरात अशा प्रकारे भटक्या कुत्र्यांना चोरून नेण्यात असल्याचे प्राणी मित्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना चोरून नेण्यामागे नेमका काय उद्देश आहे ? असा प्रश्न पोलिसांना पडला असून पोलीस या चोरांच्या शोधात आहेत. या कुत्रे चोरीबाबत प्राणीप्रेमींनी तक्रार दिल्यानंतर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत औंध येथील एका ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औंधच्या आयटीआय रस्त्यावर असलेल्या या कुत्र्यांना प्राणीप्रेमी रोज खायला द्यायचे. तसेच त्यांनी या कुत्र्यांची नावे डबूसा आणि काळी अशी नावे देखील ठेवली होती.
१५ फेब्रुवारी रोजी या कुत्र्यांना दूध आणि चपाती घेऊन काही नागरिक आले असता त्यांना ही कुत्री दिसली नाहीत. नागरिकांनी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या वेळी त्यांना खाकी रंगाचा गणवेश घातलेले २ आणि सुरक्षारक्षकाचा गणवेश घातलेले २-३ लोक त्या कुत्र्यांना कारमधून घेऊन जाताना दिसले आहेत.या प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शहरात असे प्रकार अनेक ठिकाणी घडल्याचे समोर आले आहे. नेमकी ही कुत्र्यांची चोरी करण्यामागे काय उद्देश आहे ? याचा तपास चतुःशृंगी पोलीस करत आहेत.