बारामती : बारामती तालुक्यातील कोरहाळे बुद्रूक परिसरात मुलावर हल्ला करत त्याच्या तोंडाला भटक्या कुत्रांनी जोरदार चावा ( Stray Dog Bite Child Mouth ) घेतला. ऊसतोडणीसाठी आलेल्या तोडणी कामगाराच्या मुलावर हा हल्ला झाला. यात त्याचा पूर्ण जबडा फाटला ( Strong Bite Of Child Mouth) गेला. येथील श्रीपाल हाॅस्पिटलच्या डाॅ. राजेंद्र मुथा व डाॅ. सौरभ मुथा या पिता-पुत्रांनी प्रयत्नांची शिकस्त करत या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.
पूर्ण जबडा फाटला : पाथर्डी तालुक्यातील ऊसतोडणी कामगार सध्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे कामाला आले आहेत. कोरहाळे बुद्रूकनजीक एका ठिकाणी सध्या ते राहत होते. सोमवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ऊसतोडणी कामगाराचा तीन वर्षीय मुलगा युवराज राठोड हा कोपीसमोर खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला. या घटनेत युवराज या बालकाचा पूर्ण जबडा, ओठ कुत्र्यांनी फाडून काढले. यात मोठा रक्तस्त्राव झाला. अतिशय भीषण स्थितीत पालकांनी त्याला बारामतीच्या श्रीपाल हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले.
मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया : डाॅ. राजेंद्र मुथा व डाॅ. सौरभ मुथा यांनी परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत तात्काळ उपचाराला सुरुवात केली. युवराज राठोड याच्या वडीलांकडे तर उपचारासाठी दमडीही नव्हती. त्यामुळे डाॅक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपत वैद्यकीय सेवेचे व्रत जपत स्वःखर्चातून लागलीच औषधे व अन्य सामग्री आणली. तसेच तात्काळ शस्त्रक्रियेचा निर्णयही घेतला. या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येणार होता. युवराजचे पालक तर ऊसतोडणी कामगार. त्यांच्याकडे पैशाची अडचण. परंतु मुलाचा जीव वाचला पाहिजे, भविष्याच्या दृष्टीने त्याच्यावर लागलीच शस्त्रक्रिया झाली पाहिजे हे लक्षात घेत डाॅक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ती तयारी केली.सोमवारी रात्री उशीरा युवराजवर शस्त्रक्रिया करत त्याच्या अोठ व जबड्याला टाके घालण्यात आले. रात्री बारा वाजता ही शस्त्रक्रिया संपविण्यात आली.