पुणे - कोरोनाच्या महामारीत गेल्या दीड वर्षांपासून सर्वप्रकारचे उद्योग, व्यवसाय, नोकरी बंद असतांनाही शाळेच्या व्यवस्थापनाकडून अनेक पालकांना फीसाठी तगादा लावण्यात येत आहे. फीसाठी विद्यार्थ्यांचे रिझल्ट अडवले जात आहे. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना व्हॉट्सएॅप ग्रुपमधून देखील काढण्यात येत आहे. शाळेच्या माध्यमातून पालकांची फी साठीची अडवणूक लवकरात लवकर थांबवण्यात यावी, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाच्यावतीने शिक्षण अधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले आहे.
अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन
कोरोनाच्या या काळात सर्व काही बंद असताना शाळाही ऑनलाईन सुरू आहे. असे असताना देखील काही शाळा पालकांना फी साठी तगादा लावत आहे. फी न भरल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून रोखणे, त्यांच्या पालकांना व्हॉट्सएॅपच्या ग्रुपमधून काढून टाकणे, अश्या पद्धतीने पालकांचा मानसिक छळ शाळा व्यवस्थापकांकडून केला जात आहे. पालकांचा अशा पद्धतीचा छळ लवकरात लवकर थांबवण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका
कोणत्याही विद्यार्थ्यांना फक्त फी न भरल्याच्या कारणास्तव शिक्षणापासून वंचित ठेवले जाऊ नये. तसेच फी संर्दभात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे पालकांना फी भरण्याची मुभा मिळावी, तसेच फी उशिरा भरणाऱ्या पालकांवर कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक दंड देखील आकारू नये व विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस मधून देखील काढले जाऊ नये. तसेच गेल्या एक वर्षाच्या काळात शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याच्या घरातील करता पुरुष कोरोना मुळे मृत्यूमुखी पडला असेल, तर अशा विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्यात यावी. अश्या विविध मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या आहे.
हेही वाचा - ठरलं ! नववी आणि दहावीच्या आंतरीक गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार