पुणे - शहरासह महाराष्ट्रच नव्हे तर देशभर लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना वारंवार केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात येत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही पोलीस आणि डॉक्टर दिवस रात्र काम करुन आपले कर्तव्य बजावत आहेत.
कर्तव्य बजावत असताना याच पोलिसांना कोरोनासारख्या भयानक रोगाची लागण होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे होते. अशात पुणे शहर पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांच्या आदेशावरून वारजे पोलीस स्टेशन येथे निर्जंतुकीकरण फवारणी चेंबरची उभारणी करण्यात आली आहे. आपल्यामुळे आपल्या घरातील लोकांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, म्हणून शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी कक्ष सुरु करण्यात आले आहेत.
शहरातील विविध भागांमध्ये पोलीस कर्मचारी बंदोबस्त करत असतात. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी हा कक्ष उभारण्यात आला आहे. पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांच्या आदेशानुसार निर्जंतुकीकरण फवारणी कक्ष उभारण्यात आला असल्याची माहिती वारंजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.