पुणे : भारताच्या सीमेवर शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना स्फूर्ती आणि जोष मिळावा, त्यांच्या शौर्यात वाढ व्हावी या उद्देशाने काश्मीरमध्ये भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत, यासाठी पुणेकर संस्थेने पुढाकार घेत छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधण्याचे ठरवले आहे. हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्याचे, त्यागाचे, बलिदानाचे महान प्रतीक आहे. ज्यांनी राष्ट्रहिताला सर्वतोपरी स्थान दिले.
दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ छत्रपतींचा पुतळा : महाराजांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत-पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. काश्मीरच्या किरण व तगधर-टिटवाल खोऱ्यात दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवराय हे सीमेवरील जवानांसाठी आदर्श : देशाच्या सीमेवर आपले रक्षण करणाऱ्या जवानांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. परंतु, त्यांच्यासाठी काही करण्याकरिता मोजक्याच संस्था पुढे येतात. हेच मोठे काम पुण्याच्या संस्थेने करण्याचे ठरवले आहे. जवानांमध्ये स्फूर्ती आणि देशभक्तीपर नीतीमूल्याचे रोज दर्शन घडण्याकरिता शिवरायांचा पुतळा निश्चित आदर्श ठरणार आहे. छत्रपती शिवराय हे कायमच देशभक्ती, त्याग, समर्पणाचे प्रतीक राहिले आहेत. त्यांची युद्धनीती, पराक्रम, देशहिताची धोरणे सीमेवरील जवानांसाठी आदर्श ठरणार आहेत.
डॉ. सागर दत्तात्रय डोईफोडे हे साकारणार मूर्ती : काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर दत्तात्रय डोईफोडे यांच्या पुढाकाराने मूर्ती साकारण्यात येणार आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज अटकेपार स्मारक समितीचे प्रमुख अभयराज शिरोळे व आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी या उपक्रमासाठी नियोजन केले आहे. हेमंत जाधव म्हणाले, मार्च २०२३ महिन्याच्या अखेरीस पुतळा बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे.
शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन माती भूमिपूजनासाठी : आम्ही पुणेकर संस्थेतर्फे महाराष्ट्रातील शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड या किल्ल्यांवरील माती व पाणी भूमिपूजनासाठी नेण्यात येणार आहे. अभयराज शिरोळे म्हणाले, शिवाजी महाराजांनी शत्रूंना आपल्या युद्धनीती आणि धाडसी कर्तृत्वाने पळवून लावले. त्यांच्या गनिमी काव्याचा इतर देशांनीदेखील आदर्श घेतला. सीमेवरील भारतीय जवानांना महाराजांचा आदर्श व त्याद्वारे स्फूर्ती मिळावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भारत-पाकिस्तान सीमेवर स्थापन करण्यात येणार आहे.
हेही वाचा : SC on Shiv Sena Hearing : शिवसेना कोणाची? पुढील दोन दिवस सर्वोच्च न्यायालयात होणार नियमित सुनावणी