पुणे : मणिपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ देशभरात महिला तसेच नागरिक रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, मणिपूर येथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय, माणुसकीला काळीमा फासणारी तसेच अंगावर शहारे आणणारी आहे. राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून मी राष्ट्रीय महिला आयोगाकडे पत्रव्यवहार करत या घटनेची दखल घेण्याची मागणी केली आहे. तसेच राष्ट्रीय मानव अधिकार तसेच राष्ट्रीय महिला आयोग म्हणून त्यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना त्याबाबत सूचना देत, दोषींवर कडक कारवाई करावी अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
पुणे ते बारामती सायकल स्पर्धेचे आयोजन : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज पुणे ते बारामती सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष, तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित होत्या.
राष्ट्रीय महिला आयोगाला पत्रव्यवहार : मणिपूर घटनेबाबत बोलताना चाकणकर म्हणाल्या की, अशा घटना समाजात कुठेही घडू नये. तसेच माणूस म्हणून सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. अशा पद्धतीने महिलांची जर विटंबना होत असेल तर आणि यात जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. अशा घटना महाराष्ट्रासह देशात कुठेही घडू नये. म्हणून गृहमंत्री, पंतप्रधान तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने तात्काळ यात दखल घालावी. तसेच अशा घटना घडू नये यासाठी सर्वच राज्यातील राज्य महिला आयोगाने, राष्ट्रीय महिला आयोगाला पत्रव्यवहार केला आहे.
अजित पवार यांना दिल्या शुभेच्छा : अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुपाली चाकणकर म्हणाल्या की, अजित पवार यांना उदंड आयुष्य लाभो. तसेच महाराष्ट्राचे नेतृत्व करत असताना, त्यांनी राज्याचा कारभार मुख्यमंत्री म्हणून पाहावा, ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला जे-जे अजित पवार यांच्या बाबतीत वाटत आहे. ते ते बॅनरच्या माध्यमातून मांडत असल्याचे यावेळी चाकणकर म्हणाल्या आहेत.
हेही वाचा -