पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने आयोजित सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने ने नियमित केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना एसटीदेखील अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात त्यांना अपेक्षित ठिकाणी नेण्याचे कार्य एसटी गेली ७५ वर्ष करीत आहे. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यातही एसटीचा वाटा आहे. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचे आशिर्वाद घेताना संस्कृतीची जपणूकही एसटीच्या माध्यमातून होते आहे.
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यात ते दूरदृष्य प्रणालीद्वारे बोलत होते. कार्यक्रमाला परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी एम. के. भोसले, पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.
कोरोना काळात अनेक जोखिमा असताना एसटी कर्मचाऱ्यांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली. राज्याच्या प्रत्येक क्षेत्रात , प्रत्येक दिवशी आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणात एसटीचा सहभाग आहे. एसटीमुळे आपले जीवन सुखकर झाले असे सांगणारे अनेक जण भेटतील. एसटीची ही वाटचाल चित्रफीतीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.