पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10 वीच्या परीक्षेला मंगळवार 3 मार्च पासून सुरुवात होत आहे. यंदा 3 मार्च ते 23 मार्च या कालावधीत परीक्षा होणार असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.
हेही वाचा- बंगालमध्ये भाजपचेच सरकार येणार - अमित शाह
या परीक्षेसाठी राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यात 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी तर 7 लाख 89 हजार 898 विद्यार्थिनींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 65 हजार परीक्षार्थीची वाढ झाली आहे. राज्यभरात 22 हजार शाळांमध्ये 4 हजार 89 परीक्षा केंद्र असणार आहेत. तसेच 80 उपद्रवी केंद्र असून नाशिक विभागात सर्वाधिक उपद्रवी केंद्र आहेत. यंदाही ऑनलाइन हॉल तिकीट मिळणार आहेत.
परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून राज्यभरात मिळून 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके 'गैरमार्गाशी लढा' या नावाने काम करणार आहेत. यामध्ये महिलांचे एक विशेष पथक काम करणार आहे. याशिवाय प्रत्येक विभागीय मंडळात हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या अडचणींवर 24 तास मार्गदर्शन करण्यात येणार आहे.