पुणे - अष्टविनायक मंदिरांपैकी पहिला गणपती म्हणजे बारामतीच्या मोरगाव स्थित मयुरेश्वर. पुण्यापासून 55 किमी असलेले हे मयुरेश्वर मंदिर कऱ्हा नदीच्या काठावर वसले आहे. मयुरेश्वर मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत. या प्रत्येक प्रवेश द्वारावर त्या कालखंडातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहेत. अष्टविनायकापैकी प्रथम स्थान असणारे हे मंदिर उत्तराभिमुख आहे. या मंदिराला सुमारे 50 फूट उंचीची तटबंदी आहे. मंदिर परिसरात दोन उंच अशा दीपमाळा आहेत. तसेच भाविकांनी मंदिरात प्रवेश करताच प्रथम त्यांना सहा फूट उंच असणारा दगडी उंदीर व गणपतीकडे तोंड असणाऱ्या भल्यामोठ्या नंदीचे दर्शन होते.
गणपती मंदिरात नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे. या मंदिरातील मयुरेश्वराच्या मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली असून मूर्तीच्या नाभीत व डोळ्यात हिरे जडवले आहेत. तसेच या मूर्तीवर नागाचे संरक्षण छत्र आहे. मंदिरात रिद्धी-सिद्धी यांच्याही मुर्ती आहेत. हा मंदिर परिसर भूस्वनंदा या नावाने ही ओळखला जातो. अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात या मंदिराच्या दर्शनाने होते.
मंदिराची आख्यायिका
पूर्वी सिंधू नावाच्या एका असुराने पृथ्वीवर हैदोस माजवला होता. या असुराचा नाश करण्यासाठी देवतांनी गणपतीची आराधना केली. तेव्हा गणपतीने मोरावर आरुढ होऊन सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे येथील गणपतीला मयुरेश्वर असे नाव पडले. या मंदिरातील मयुरेश्वराच्या मूर्ती संबंधी असेही म्हटले जाते, की ब्रह्मदेवांनी दोन वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती सिंधू असुराने तोडली होती. म्हणून पुन्हा एक मूर्ती बनवण्यात आली. सध्या या मंदिरातील मयुरेश्वराची मूर्ती खरी नसून त्या मूर्तीच्या मागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. पहिली मूर्ती वाळू व लोखंडाचे अंश तसेच हिऱ्यांपासून बनवली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांचा शुकशुकाट
गणपती उत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीसह वर्षभर हजारो भाविक मयुरेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. यंदाचा भाद्रपदी यात्रा उत्सव 19 ऑगस्टपासून सुरू झाला आहे. या उत्सव काळात भाविक श्रींच्या दर्शनासाठी मुख्य गाभार्यापर्यंत जात असतात. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे भाविकांसाठी मंदिर प्रवेश बंद आहे. गणेश उत्सव काळात दरवर्षी भाद्रपद शुद्ध ते पंचमी या कालावधीत धार्मिक कार्यक्रम होत असतात. यावेळी सर्व भाविकांना श्रींच्या मुख्य गाभार्यापर्यंत जाऊन मूर्तीला जल स्नान व अभिषेक पूजा घालण्याची परवानगी असते. मात्र कोरोनामुळे मंदिर प्रवेश बंद असल्याने मंदिर परिसरात भाविकांचा शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
मंदिर बंद असल्यामुळे व्यवसाय ठप्प
अष्टविनायकांपैकी प्रथम स्थान असणाऱ्या मयुरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक येथे येत असतात. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या उत्तम राहण्याची व भोजनाची सोय खासगी स्तरावर आहे. मात्र तब्बल सहा महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे भाविकांची संख्या पूर्णत: खालावली आहे. त्यामुळे या ठिकाणचे हॉटेल्स, लॉज, यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झालाय. तसेच मंदिरावर अवलंबून असणारे व पूजेसाठी आवश्यक वस्तू (उदा.. हार,अगरबत्ती व प्रसादाचे साहित्य) इत्यादी. व्यवसाय पूर्णतः बंद असल्याने त्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे.
पूजा आणि उत्सव
मयुरेश्वर मंदिरात नियमितपणे सकाळी ५ वाजता प्रक्षाल पूजा (गणपतीचे स्नान), सकाळी ७ वाजता शोडपचार पूजा, दुपारी १२ वाजता दुसरी शोडपचार पूजा, रात्री ८ वाजता पंचोपचार पूजा आणि रात्री १० वाजता शेजआरती केली जाते. मुख्य गणेश मूर्तीची पूजा दररोज सकाळी ७, दुपारी १२ आणि रात्री ८ वाजता केली जाते.