पुणे : पर्यावरण पूरक वातावरणासाठी आता आपण पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून, सध्या मोठ्या प्रमाणावर ई-बाईकचा ( Electric bikes ) पर्याय निवडला आहे. आणि सध्या बाजारात इलेक्ट्रीक बाईकला खूप डिमांड असून पर्यावरणाच्या दृष्टीने आणि महागाईच्या कारणाने लोक ई-बाईक खरेदी करत असतात.आत्ता शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील बैल जोडीला पर्याय म्हणून बाजारात इलेक्ट्रिक बैल ( special electrik bail ) आला आहे. सोनाली वेलीजाळी आणि तुकाराम सोनावणे या अभियंते असलेल्या दांपत्याने तेल बॅटरीवर चालणारे, प्रदूषण विरहित, आकाराने लहान असे बहुउद्देशीय असे यंत्र तयार केले. हे यंत्र पेरणी, खते देणे अशा कामांसोबतच तण काढणी, फवारणी करणे अशी कामे अत्यंत कमी खर्चात करू शकते.
इलेक्ट्रीक बैलची निर्मीती - कोरोना काळात सोनाली वेलजाळी- सोनावणे आणि तुकाराम सोनावणे हे सहकुटुंब स्वतःच्या गावी आंदरसूल (ता. येवला, जि. नाशिक) येथे गेले. सलग सहा महिने राहण्याची संधी मिळाली. गेल्या २५-३० वर्षांमध्ये गावातील अनेक गोष्टी नक्कीच बदलल्या असल्या तरी शेती क्षेत्रातील पारंपरिक पद्धतीनेच कामे होत असल्याचे जाणवले. उलट पूर्वीच्या तुलनेमध्ये अनेक समस्या वाढलेल्या दिसत होत्या. गावामध्ये पूर्वी बैलाचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असे, तो आता कमी झाला होता. शेती क्षेत्राचा आकार कमी होत चालल्याने बैल सांभाळणे अवघड होत आहे. त्याऐवजी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. अनेक लहान शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणेही दुरापास्त आहे. तसेच पिकाच्या सुरुवातीच्या मशागतीसाठी भाड्याने ट्रॅक्टर वापरला जात असला तरी पूर्वी बैलांच्या साह्याने केलेली अंतरमशागतीसाठी मनुष्यबळ किंवा बैल उपलब्ध होत नाहीत. शेतकऱ्याकडे आज फार पर्यायच राहिलेले नाहीत.म्हणून या जोडप्याने बाजारात इलेक्ट्रिक बैल आणले आहे.
या इलेक्ट्रिक बैलची वैशिष्ट्य - बहुउद्देशीय बॅटरीचलित हे यंत्र एक व्यक्ती सहज हाताळू शकेल असे शेतीपयोगी यंत्र आहे. हे एक ॲक्सलरहित यंत्र असून, बॅटरीकडून उपलब्ध होणाऱ्या डि.सी. पुरवठ्यावर चालते. यंत्राला एकदा चार्ज केले की तीन ते चार तास विनासायास काम करते. यामध्ये व्हायब्रेशन्स अजिबात होत नाहीत, यामुळे पॉवर टिलर किंवा अन्य मनुष्यचलित यंत्र काम करण्यास सोपे जाते. आकार लहान असल्याने दोन ओळी, दोन झाडांमध्येही सहज काम करू शकते. हलकी पूर्वमशागत, पेरणी व आंतरमशागतीची कामांसाठी उपयुक्त आहे. प्रदूषण शून्य, कर्ब व अन्य हानिकारक वायूंचे उत्सर्जन शून्य त्यामुळे वातावरण पर्यावरणपूरक राहण्यास मदत होईल.
पुण्यातील एका प्रदर्शनात दिली माहिती - सध्या पुण्यातील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत आयोजित प्रदर्शनात हे इलेक्ट्रिक बैल आणण्यात आले आहेत. याला शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहे.या प्रदर्शनात विविध सेंद्रिय शेती उत्पादने, कृषि प्रक्रिया उद्योग, शेतीसाठी सौर तंत्रज्ञान, सिंचन क्षेत्रातील तंत्रज्ञान, केंद्र व राज्य शासनाच्या कृषि संबंधित विभागाचे कार्य, फलोत्पादन क्षेत्राशी संबंधित नवोपक्रम, मधमाशी पालन, फलोत्पादन आणि भाजीपाला उत्पादनातील नवे तंत्रज्ञान विषयक माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे.