पुणे - शिरुर लोकसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली. यावेळी शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या 'इतिहास घडणार असल्याच्या' वक्तव्याला उत्तर दिले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात आढळराव-पाटलांचा विजय हाच या मतदारसंघात इतिहास घडणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शिरुर लोकसभेत यावेळी इतिहास घडणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले होते.
राज्यामध्ये चौथ्या टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. त्याप्रमाणे आज शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्येही सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली. या मतदारसंघांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे आमने-सामने लढत होत आहे. शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉक्टर अमोल कोल्हे हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नारायणगाव येथे तर शिवसेनेचे उमेदवार शिवाजी आढळरावपाटील यांनी लांडेवाडी येथे सकाळी मतदान केले.
मागील काही दिवसापासून प्रचारामध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा या मतदारसंघात झाल्या त्यामुळे हा मतदारसंघ मोठा प्रतिष्ठेचा मतदारसंघ मानला जात असताना आज या दोन्ही उमेदवारांचे भवितव्य मतपेटी मध्ये बंद होणार आहे सकाळपासूनच खेड आंबेगाव जुन्नर शिरूर भोसरी हडपसर या विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी सात वाजल्यापासून संथ गतीने मतदान सुरू असून तरुणाईचा मतदानाला चांगल्या प्रतिसाद पाहायला मिळत आहे.