भिमाशंकर (पुणे) - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर कोरोना महामारीच्या संकटामुळे दर्शनासाठी व पर्यटकांसाठी बंद आहे. मात्र, भिमाशंकर येथे श्रावण मासातील आज तिसऱ्या सोमवारी श्री क्षेत्र भिमाशंकरला पाच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत शिवाभिषेक करुन शिवलिंगाचा शुंगार करत महाआरती करण्यात आली
दरवर्षी श्री क्षेत्र भिमाशंकर येथे श्रावण महिन्यात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. मात्र कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार भिमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवून या परिसरातील पर्यटनासाठी बंदी घालण्यात आल्याने शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मात्र, श्रावणमासातील भिमाशंकरला पहाटेची पाच वाजताची पहिली महापूजा करुन मंदिर बंद करण्यात येत आहे. तर दुपारी 12 वाजता नैवद्य पुजा, 3 वाजता आरती, सायंकाळी 7:30 वाजता आरती नित्यनियमाने पाच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येत आहे हा पुजेचा नित्यनियम सुरू असताना शिवलिंगाचा शुंगार परंपरेनुसार सजविण्यात येत आहे
श्रावण महिना 21 जुलैला सुरू झाला आहे. त्यामुळे भिमाशंकरला जाणारे दोन्ही मार्गांवर पोलिसांची नाकेबंदी लावण्यात आली आहे. या परिसरात पर्यटक व भाविक येत असताना दंडात्मक कारवाई करुन थेट गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती उपविभागिय पोलीस अधिकारी गजानन टोंम्पे यांनी दिली
भिमाशंकरला जाणारे मार्ग आज बंद...
भिमाशंकरला जाण्यासाठी पुणे नाशिक महामार्गावरुन राजगुरुनगर व मंचर येथून दोन मार्ग आहे. या दोन्ही मार्गावरील भिमाशंकर जवळील गावांमध्ये पोलीस पाटील व गावक ऱ्यांच्या मदतीने भिमाशंकरकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी व पर्यटकांनी विनाकारण या मार्गावरुन प्रवास करुन नये, असे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.