पुणे - शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला जुन्नर येथील सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या ५० कार्यकर्त्यांनी किल्ल्यावर दीप प्रज्वलित केले. यामुळे शिवजन्मस्थान परिसर उजळून निघाला.
शिवनेरी गडावर शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी होते. आज सकाळी ७ वाजता सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या हस्ते शिवाई मातेस अभिषेक, ८ वाजता छबीना पालखी मिरवणूक, सकाळी ९ वाजता शिवजन्म सोहळा, साडे नऊ वाजता ध्वजारोहण आणि पोवाडे गायन कार्यक्रम, ११ वाजता राजमाता जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळा, असे कार्यक्रम झाले. यावेळी स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार हभप डॉ. मोहिनीताई विठ्ठल पाबळे यांना प्रदान करण्यात आला.
शिवनेरीवर शिवजयंतीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आज राज्यभरातून अनेक शिवभक्त दाखल झाले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.